
भारत छोडो आंदोलन दिवस | 8 ऑगस्ट | Quit India Movement | ऑगस्ट क्रांती दिन | 9 ऑगस्ट

भारत छोडो आंदोलन दिवस : 8 ऑगस्ट
Quit India Movement
ऑगस्ट क्रांती दिन : 9 ऑगस्ट
Subject : GS- भारताचा इतिहास - भारत छोडो आंदोलन
या टॉपिक मध्ये आपण बघणार आहोत :
• भारत छोडो आंदोलन कशामुळे झाले ?
• भारत छोडो आंदोलन
• भारत छोडो चळवळीचे 3 टप्पे
• समांतर सरकार म्हणजे काय ?
• सातारा येथील प्रतिसरकार
• भारत छोडो आंदोलन अयशस्वी का झाले ?
• भारत छोडो आंदोलनाचे काही महत्त्वाचे वनलाईनर पॉईंट्स ज्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात .
• सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरे
भारत छोडो आंदोलन कशामुळे झाले ?
• क्रिप्स मिशनचे अपयश : क्रिप्स मिशनने भारताला पूर्ण स्वातंत्र्य दिले नाही तर फाळणीसह भारताला वसाहतीच्या स्वातंत्र्याचा दर्जा (डोमिनियन दर्जा) दिला हे भारत छोडो चळवळीचे तात्काळ कारण होते.
• राष्ट्रीय भावना : 1942 पर्यंत, भारताचा स्वातंत्र्याचा लढा अनेक दशके चालू होता. राष्ट्रीय भावना शिगेला पोहोचली होती आणि लोकांमध्ये ब्रिटीश राजवटीच्या दडपशाही बद्दल असंतोष वाढला होता.
• दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम : भारतीयांच्या मर्जी विरुद्ध भारताला दुसऱ्या महायुद्धात सामिल करणे तसेच दुसऱ्या महायुद्धामध्ये महागाई, अन्नधान्याचा तुटवडा त्यामुळे मोठ्या प्रमाणात उपासमारी झाली होती.
• 1943 चा बंगाल दुष्काळ : उपासमार, मलेरिया, रोगराई, कुपोषण यामुळे एकट्या बंगालमध्येच लाखो लोक मृत्युमुखी पडले.
या सर्व कारणांमुळे लोकांमध्ये ब्रिटीश राजवटी विरूद्ध रोष वाढला.

भारत छोडो आंदोलन
• काँग्रेस पक्षाच्या 1942 च्या वर्धा येथील बैठकीत महात्मा गांधींनी भारत छोडोचा ठराव मांडला.
• 8 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींजींनी मुंबईतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनात ब्रिटिश राजवट संपवण्यासाठी 'भारत छोडो' आंदोलनाची हाक दिली होती. म्हणून 8 ऑगस्ट हा दिवस भारत छोडो आंदोलन दिवस म्हणून ओळखला जातो.
• 9 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या 'गोवालिया टँक' येथे अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महाअधिवेशन भरले.
• या अधिवेशनातील आपल्या भाषणात महात्मा गांधींनी भारतीयांना 'करेंगे या मरेंगे' असा मंत्र दिला
• भारत छोडो आंदोलनातून ब्रिटिशांना भारत सोडून जाण्याचा इशारा देण्यात आला होता.
• त्यानंतर 9 ऑगस्ट हा दिवस 'क्रांती दिन' म्हणून पाळण्यात आला.
• या आंदोलनाची सुरुवात मुंबईतील ‘गोवालीया टँक’ म्हणजे आजच्या ‘ऑगस्ट क्रांती मैदाना’ तून झाली
• ऑगस्टमध्ये हे आंदोलन सुरू झाल्यानं या आंदोलनाला 'ऑगस्ट चळवळ' किंवा 'ऑगस्ट क्रांती' असंही म्हटलं जातं.
(महत्त्वाची नोट : 1942 च्या वर्धा येथील बैठकीत भारत छोडोचा ठराव मांडला गेला आणि 1942 च्या मुंबई अधिवेशनात भारत छोडोची घोषणा केली आणि आंदोलन सुरू झाले.)
भारत छोडो चळवळीचे 3 टप्पे होते :
पहिला टप्पा :
• शहरी बंडखोरी, संप, बहिष्कार आणि धरण्याला बसणे यांनी चिन्हांकित केले, जे त्वरीत दडपले गेले.
• देशभरात संप आणि निदर्शने झाली आणि कामगारांनी कारखान्यांमध्ये काम न करून पाठिंबा दर्शविला.
• गांधीजींना पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये कैद करण्यात आले आणि जवळपास सर्व नेत्यांना अटक करण्यात आली.
दुसरा टप्पा :
• चळवळीच्या दुसऱ्या टप्प्याने ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्रीत केले, ज्यात एक मोठा शेतकरी विद्रोह दिसून आला, ज्याचा मुख्य उद्देश म्हणजे दळणवळण प्रणाली विस्कळीत करणे, जसे की रेल्वे ट्रॅक, तार आणि खांब उखडले, सरकारी इमारतींवर हल्ले चढविले.
तिसरा टप्पा :
अंतिम टप्प्यात वेगवेगळ्या भागात राष्ट्रीय सरकारे किंवा समांतर सरकारे स्थापन झाली.
या सरकारांना प्रति सरकार असे म्हणतात.
उत्तर प्रदेश :
• बलिया व आझमगड प्रदेशात चितू पांडे व सहकाऱ्यांनी ऑगस्ट 1942 मध्ये
देशातील पहिले प्रतिसरकार स्थापन केले.
• त्यांनी जिल्हाधिकाऱ्यास सत्ता सोडण्यास भाग पाडले व तुरुंगातील सर्व नेत्यांना मुक्त केले.
बंगाल प्रांत :
• बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील तामलूक येथे 17 डिसेंबर 1942 ते सप्टेंबर 1944 दरम्यान जातीय सरकार स्थापन झाले.
• याचे नेतृत्व सतीशचंद्र सामंत यांनी केले.
• चक्रीवादळातील पिडितांना मदत करणे, शाळांना अनुदान देणे, श्रीमंतांकडील अतिरिक्त तांदूळ गरिबांना वाटणे ही कामे या सरकारने केली.
सातारा येथील प्रतिसरकार :
• साताऱ्यातील प्रतिसरकार हे 1 जून 1943 पासून 13 जून 1946 पर्यंत कार्यरत होते.
• या सरकारला पत्री सरकार असेही म्हणत.
• याचे नेतृत्व नाना पाटील आणि किसनवीर यांनी केले होते.
त्याचप्रमाणे ओडिसा येथील बालासोर या ठिकाणी तर आंध्र प्रदेशात भीमावरम येथे प्रतिसरकार स्थापन झाली.
भारत छोडो आंदोलनाचे काही महत्त्वाचे वनलाईनर पॉईंट्स ज्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात .
• या चळवळी दरम्यान मुंबईत सिक्रेट (भूमिगत) रेडिओ स्टेशन उषा मेहता, चंद्रकांत बाबू यांनी चालू केले तर यावरून भाषण राम मनोहर लोहिया देत.
• स्वातंत्र्य चळवळीतील ग्रँड ओल्ड लेडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अरुणा असफल अली या भारत छोडो आंदोलनादरम्यान मुंबईतील गोवालिया टॅंक मैदानावर भारतीय ध्वज फडकवण्यासाठी ओळखल्या जातात.
• भारत छोडो चळवळीला : चले जाव चळवळ, ऑगस्ट चळवळ, 'ऑगस्ट क्रांती' किंवा दिल्ली चळवळ असेही म्हणतात.
भारत छोडो आंदोलन अयशस्वी का झाले ?
(MPSC ASO 2012 मध्ये यावर प्रश्न )
• मुस्लिम लीग, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि हिंदू महासभा यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला नाही.
• सरकारी नोकरीत असलेल्यांनी चळवळीत भाग घेतला नाही.
• ब्रिटिश सरकार पुढे निशस्त्र लोकांचा निभाव लागणे कठीण होते.
• चळवळी पूर्वीच काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते आणि गांधीजींना अटक केली गेली.
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारत छोडो चळवळीत ------ यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केले.
(MPSC PSI 2016, महाराष्ट्र पोलीस भरती)
1. नरदेव शास्त्री
2. उमाजी नाईक
3. नाना पाटील
4. गणपतराव कथले
उत्तर : नाना पाटील
प्रश्न) चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरु झाली ?
(महाराष्ट्र पोलीस भरती कोल्हापूर बँड्समन 2021)
1. 1940
2. 1942
3. 1944
4. 1946
उत्तर : 1942
प्रश्न) चले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला ?
(महाराष्ट्र पोलीस भरती - नवी मुंबई 2021, वर्धा चालक 2021)
1. महात्मा गांधी
2. लालबहादूर शास्त्री
3. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
4. जवाहरलाल नेहरू
उत्तर : जवाहरलाल नेहरू
प्रश्न) काँग्रेस पक्षाच्या 1942 च्या---- येथील बैठकीत महात्मा गांधींनी भारत छोडोचा ठराव मांडला ?
(महाराष्ट्र पोलीस भरती - वर्धा चालक)
1. फैजपूर
2. नागपूर
3. वर्धा
4. अलाहाबाद
उत्तर : वर्धा
प्रश्न) भारत छोडो आंदोलनात देशात कोठे प्रतिसरकार स्थापन करण्यात आले होते ?
(MPSC ASO 2013, SSC GD महाराष्ट्र पोलीस भरती)
1. बलिया (उत्तर प्रदेश)
2. मिदनापूर (बंगाल)
3. सातारा (महाराष्ट्र)
4. वरील सर्व पर्याय योग्य
उत्तर : वरील सर्व पर्याय योग्य
प्रश्न) 1942 ची चळवळ अयशस्वी का झाली ?
(MPSC ASO -2012)
A) ब्रिटिश सरकार पुढे निशस्त्र लोकांचा निभाव लागणे कठीण होते.
B) चळवळी पूर्वीच सरकारने गांधींना अटक केली.
C) सरकारी नोकरीत असलेल्यांनी चळवळीत भाग घेतला नाही.
D) मुस्लिम लीगने चळवळीस पाठिंबा दिला नाही.
पर्याय
1. A, B व C बरोबर
2. B,C व D बरोबर
3. B व C बरोबर
4. A, B, C व D बरोबर
उत्तर : A, B, C व D बरोबर