
चालू घडामोडी 15, फेब्रुवारी 2025 | मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू | President’s Rule imposed in Manipur

मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू
President’s Rule imposed in Manipur
Subject : GS - राज्यशास्त्र, आणीबाणी
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट भारतीय संविधानाच्या कलम ---- अंतर्गत लागू करण्यात आली.
1. कलम 350
2. कलम 352
3. कलम 356
4. कलम 360
उत्तर : कलम 356
बातमी काय आहे ?
भारतीय संविधानाच्या कलम 356 अंतर्गत मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.
मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट का लागू करण्यात आली ?
• मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी-झो या समाजामध्ये गेली पावणेदोन वर्षे वांशिक संघर्ष सुरू आहे.
• हिंसाचारात 250 पेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडले तर लाखो लोक बेघर झाले.
• हा हिंसाचार हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे.
• मणिपूर मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर भारतीय संविधानाच्या कलम 356 अंतर्गत मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.
राष्ट्रपती राजवट म्हणजे काय ?
What is the President's Rule ?
• राष्ट्रपती राजवट म्हणजे राज्य सरकार आणि त्याच्या विधानसभेचे निलंबन.
• ज्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू केलेले राज्य केंद्र सरकारच्या थेट नियंत्रणाखाली येते.
राज्यात राष्ट्रपती राजवट केव्हा लागू करण्यात येते ?
• ज्यावेळेस राज्याचे शासन घटनात्मक तरतुदींना अनुसरून चालविणे अशक्य झाले आहे याची खात्री झाल्यास राष्ट्रपती राज्य शासन आपल्या हाती घेतात यालाच राष्ट्रपती राजवट किंवा राज्य आणीबाणी किंवा घटनात्मक आणीबाणी असे म्हटले जाते.
• भारतीय संविधानाच्या कलम 356 अंतर्गत राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यात येते.
• त्यासाठी भारतीय राज्यघटनेत दोन आधार दिलेले आहे. कलम 356 मधील आधारावर आणि कलम 365 मधील आधारावर
कलम 356 : राज्यातील घटनात्मक यंत्रणा बंद पडल्यास :
• त्याबाबत तरतुदी जर राष्ट्रपतींना एखाद्या राज्याचे शासन घटनात्मक तरतुदींना अनुसरून चालवणे शक्य नाही अशी परिस्थिती उद्भवली आहे याची खात्री झाली तर त्या राज्यात राष्ट्रपती, राष्ट्रपती राजवट लावण्याची घोषणा करू शकतात.
कलम 365 : केंद्राच्या निर्देशांचे पालन करण्यात कसूर केल्यास :
• केंद्राने एखाद्या राज्याला दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यात किंवा त्यांची अंमलबजावणी करण्यात त्या राज्याने कसूर केली तर राष्ट्रपती अशा राज्यात कलम 356 अंतर्गत राष्ट्रपती राजवट लावण्याची घोषणा करू शकतात.
नोट : कलम 365 फक्त राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी आधार (Grounds for Proclamation) आहे,
दोन्ही परिस्थिती भारतीय संविधानाच्या कलम 356 अंतर्गत राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यात येते.