
चालू घडामोडी 23, जानेवारी 2025 | सुकन्या समृद्धी योजना | Sukanya Samriddhi Yojana

सुकन्या समृद्धी योजना
Sukanya Samriddhi Yojana
Subject : GS - सरकारी योजना
सरळसेवा, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) सुकन्या समृद्धी योजने बद्दल खालील विधानांचा विचार करा आणि योग्य विधान विधाने असलेला पर्याय निवडा.
अ) ही योजना 22 जानेवारी 2015 रोजी सुरू करण्यात आली आहे.
ब) ही योजना बेटी बचाओ, बेटी पढाओ मोहिमेचा एक भाग आहे.
क) मुलीच्या शिक्षण आणि लग्नाच्या खर्चास मदत म्हणून ही योजना तयार केलेली आहे.
पर्याय :
1. फक्त अ आणि ब बरोबर
2. फक्त अ आणि क बरोबर
3. फक्त ब आणि क बरोबर
4. अ, ब आणि क बरोबर
उत्तर : अ, ब आणि क बरोबर
बातमी काय आहे ?
• 22 जानेवारी 2025 रोजी सुकन्या समृद्धी योजनेची 10 वर्षे पूर्ण होत आहेत.
• नोव्हेंबर 2024 पर्यंत, 4.1 कोटी सुकन्या समृद्धी खाती उघडली गेली आहेत, जी योजनेचे यश आणि सर्वसमावेशकता आणि प्रगतीला चालना देण्यासाठीची या योजनेची भूमिका अधोरेखित करते.
सुकन्या समृद्धी योजना केव्हा सुरू करण्यात आली ?
22 जानेवारी 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाओ, बेटी पढाओ मोहिमेचा एक भाग म्हणून सुकन्या समृद्धी योजना सुरू केली.
सुकन्या समृद्धी योजनेचे उद्दिष्ट काय ?
सुकन्या समृद्धी योजना का सुरू करण्यात आली ?
• मुलीच्या शिक्षण आणि लग्नाच्या खर्चास मदत म्हणून ही योजना तयार केलेली आहे.
• या योजनेमार्फत केलेली गुंतवणूक मुलीच्या शिक्षणास आणि लग्नासाठी लागणाऱ्या खर्चासाठी उपयोगी पडू शकते.
• मुलींच्या भविष्यातील कल्याणासाठी बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी.
• मुलींची आर्थिक सुरक्षा आणि सामाजिक सशक्तीकरणासाठी बेटी पढाओ मोहिमेचा एक भाग म्हणून सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्यात आली.
सुकन्या समृद्धी योजना काय आहे ?
• सरकारची केवळ मुलींसाठीची ही योजना आहे.
• सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत बचत खाते उघडून देण्यात येते. या बचत खात्याला सुकन्या समृद्धी खाते असे देखील म्हटले जाते.
• वयोगट 10 वर्षांच्या कमी मुलींचे खाते पोस्ट ऑफिस, राष्ट्रीय बँक, अन्य एजन्सीमार्फत उघडले जाऊ शकते.
सुकन्या समृद्धी योजनेची पात्रता आणि तरतूद
• या योजनेत मुलीच्या जन्मापासून ती 10 वर्षांची होईपर्यंत मुलीच्या नावावर हे खाते उघडता येते.
• एका मुलीसाठी एकच बँक अकाउंट उघडता येईल.
• प्रति कुटुंब जास्तीत जास्त 2 सुकन्या समृद्धी खाते (दोन मुलींसाठी) उघडू शकते. (जुळ्या अपत्यांसाठी अपवाद).
• सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत कमीत कमी 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रूपयांची एका वर्षात गुंतवणूक करता येईल.
• मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर जमा राशीमधून 50 % रक्कम आणि मुलीचे वय 21 वर्षाचे झाल्यास तसेच मुलीचे लग्न झाल्यास पूर्ण जमा राशी (Deposit) काढता येऊ शकते.
सुकन्या समृद्धी योजनेचा फायदा काय ?
• आकर्षक व्याजदर : सुकन्या समृद्धी योजना इतर अनेक बचत योजनांपेक्षा जास्त व्याजदर (8.2%) देते, ज्यामुळे ती एक फायदेशीर दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय बनते.
• करमुक्त : गुंतवणूकीवर प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सूट देखील उपलब्ध आहे.
• करमुक्त व्याज : सुकन्या समृद्धी खात्यावर मिळणारे व्याज पूर्णपणे करमुक्त असते.
• मॅच्युरिटीवर कर सूट : अंतिम मॅच्युरिटी रक्कम, मुद्दल आणि जमा झालेल्या व्याजासह, करमुक्त आहे.
सुकन्या समृद्धी योजना करमुक्त आहे का ?
हो, सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक केल्यावर, प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80C (80C of Income Tax Act) अंतर्गत कर सूट देखील उपलब्ध आहे.