
चालू घडामोडी 30, सप्टेंबर 2024

माझी वसुंधरा अभियान
MAJHI VASUNDHARA
Subject : GS - सरकारी योजना, पर्यावरण
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) माझी वसुंधरा अभियान ४.० चा दीड हजारपेक्षा कमी लोकसंख्या गटात खालील पैकी कोणत्या गावाने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
1. मान्याचीवाडी
2. भिलार
3. पाटोदा
4. अंतरवाली सराटी
उत्तर : मान्याचीवाडी

• महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने माझी वसुंधरा अभियान ४.० चा निकाल जाहीर केला असून, दीड हजारपेक्षा कमी लोकसंख्या गटात पाटण तालुक्यातील मान्याचीवाडीने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
• वसुंधरा अभियान ४.० हे राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांत १ एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२४ पर्यंत राबविण्यात आले. यात राज्यातील २२ हजार २१८ ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता.
माझी वसुंधरा अभियान काय आहे ?
• माझी वसुंधरा अभियान हा महाराष्ट्र शासनाचा एक उपक्रम आहे.
• हे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पर्यावरणाच्या सुधारणेसाठी निसर्गाच्या पाच घटकांच्या (पंचमहाभूते) अंतर्गत संभाव्य कृती बिंदू ओळखण्यावर लक्ष केंद्रित करते.
• हे अभियान 2 ऑक्टोबर 2020 रोजी,पर्यावरण आणि हवामान बदल विभाग, महाराष्ट्र सरकार द्वारे सुरू करण्यात आले.
माझी वसुंधरा अभियानाचे उद्दिष्टे काय आहे ?
वेळीच आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने वातावरणीय बदल कमी करण्याबाबत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये नागरिकांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणे.
माझी वसुंधरा अभियान कृती क्षेत्रे काय आहेत ?
• हा उपक्रम निसर्गाच्या "पंचमहाभूते" नावाच्या 5 ही घटकांवर लक्ष केंद्रित करतो.
• त्यात भूमी (जमीन), जल, वायू (हवा), अग्नी (ऊर्जा), आकाश (संवर्धन) यांचा समावेश आहे.
1) पृथ्वी/ भूमी (Earth) :
वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व जमिनीचे धुपीकरण इत्यादी बाबींवर कार्य करणे.
2) वायू (Air) :
हवेच्या गुणवत्तेसाठी वायूप्रदूषण कमी करून हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे.
3) जल (Water) :
• नदी संवर्धन, सागरी जैव विविधता, जलस्रोतांचे संवर्धन व संरक्षण तसेच त्यांचे पुनरुज्जीवन करणे. सागरी किनारे यांची स्वच्छता करणे.
• पावसाच्या पाण्याची साठवण व पाझर.
• सांडपाण्यावर प्रक्रिया करणे.
4) अग्नी (Energy) :
• ऊर्जेचा परिणामकारक वापर, ऊर्जा बचत तसेच ऊर्जेचा अपव्यय टाळणे या बाबींना प्रोत्साहन देणे.
• अपारंपरिक ऊर्जेच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे.
• अक्षय ऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन करणे.
5) आकाश (Enchanement) :
जनजागृती व शैक्षणिक कार्यक्रमांद्वारे पर्यावरण सुधारणा व संरक्षणाविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे.
• एक हरित कायदा (One Green Act) पाळण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणे.
मान्याचीवाडी महाराष्ट्रातील पहिले सौरगाव याबद्दल अधिक माहितीसाठी खालील Video बघा 👇👇
किल्लारी भूकंप
Killari Earthquake
किल्लारी भूकंपात बळी पडलेल्यांना मानवंदना 🙏💐 💐
Subject : GS - भूगोल
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे भूकंप केव्हा झाला ?
1. 1988
2. 1991
3. 1993
4. 1998
उत्तर : 1993

• लातूर जिल्ह्यातील किल्लारी गावात 30 सप्टेंबर 1993 मोठा भूकंप झाला.
• पहाटे 3 वाजून 56 मिनिटांनी अचानक हादरे जाणवले.
• 6. 4 रिश्टर स्केलचा हा भूकंप होता.
• लातूर आणि उस्मानाबादच्या 52 गावांवर या भूकंपाचा प्रभाव पडला.
• या भूकंपात 9748 लोकांनी आपला जीव गमावला. 30000 लोक जखमी झाले. तर 15 हजार 854 जनावरं मृत्यूमुखी पडली.
किल्लारी भूकंपाच्या वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते ?
किल्लारी भूकंपाच्या वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री शरद पवार होते.
पुनर्वसन :
• किल्लारी भूकंपावेळी बाधित झालेल्या गावांची गरज लक्षात घेऊन या गावांचे पुनर्वसन खेळण्यात आले.
• त्यावेळी ५२ गावांचे पुनर्वसन करण्याच्या या प्रकल्पावर १२०० कोटींचा खर्च होता.
• जागतिक बँकेची या प्रकल्पाच्या खर्चावर देखरेख होती.
• पूर्ण गाव वसवणे अशा प्रकारचा देशातील हा पहिलाचा प्रकल्प होता.
SASTRA रामानुजन पुरस्कार
SASTRA Ramanujan Prize
बातम्यांमध्ये : अलेक्झांडर डन यांना 2024 साठी SASTRA रामानुजन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Subject : GS - पुरस्कार, व्यक्ती
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) SASTRA रामानुजन पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील व्यक्तींना देण्यात येतो ?
1. संगीतकारांना
2. साहित्यिकांना
3. गणितज्ञांना
4. खेळाडूंना
उत्तर : गणितज्ञांना

SASTRA रामानुजन पुरस्काराबद्दल थोडक्यात माहिती :
SASTRA पुरस्काराची स्थापना २००५ साली करण्यात आली..
22 डिसेंबर रोजी रामानुजन यांच्या जयंतीदिनी, तामिळनाडूमधील कुंभकोणमजवळील कॅम्पसमध्ये SASTRA विद्यापीठाकडून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
पात्रता:
• हा पुरस्कार दरवर्षी जगभरातील श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रभावाखाली असलेल्या क्षेत्रात काम करणाऱ्या 32 वर्षांपेक्षा कमी वयाच्या गणितज्ञांना दिला जातो.
• रामानुजन यांनी 32 वर्षाच्या आपल्या आयुष्यात अभूतपूर्व कार्य केले या वस्तुस्थितीचे स्मरण करण्यासाठी वयोमर्यादा 32 वर्षे आहे.
पुरस्काराचे स्वरूप : प्रशस्तीपत्र आणि रोख पारितोषिक $ 10,000 पुरस्कार देण्यात येतो.
श्रीनिवास रामानुजनत्यांबद्दल थोडक्यात माहिती :
• श्रीनिवास रामानुजन हे एक महान भारतीय गणितज्ञ होते.
• पूर्ण नाव : श्रीनिवास रामानुजन अय्यंगार
• जन्म : 22 डिसेंबर 1887 रोजी इरोड, तामिळनाडू येथे त्यांचा जन्म झाला.
• रामानुजन हे ब्रिटनच्या रॉयल सोसायटीच्या सर्वात तरुण सदस्यांपैकी एक होते.
• केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिटी कॉलेजचे फेलो म्हणून निवडलेले पहिले भारतीय होते.
• त्यांनी गणितीय विश्लेषण, संख्या सिद्धांत, अनंत मालिका आणि सतत अपूर्णांक यामध्ये योगदान दिले.
• रामानुजन यांनी सुमारे 3,900 गणिती निकाल आणि समीकरणे संकलित केले.
• त्याच्या सर्वात मौल्यवान शोधांपैकी एक म्हणजे त्याची π (pi) साठी अनंत मालिका.
• मृत्यू : 26 एप्रिल 1920 कुंभकोणम, तामिळनाडू, येथे वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी क्षयरोगामुळे त्यांचे निधन झाले.
रामानुजन संख्या काय आहे ?
• 1729 ही संख्या, रामानुजन संख्या म्हणून ओळखली जाते.
• 1729 ही दोन वेगवेगळ्या घनांच्या बेरजेने येणारी सगळ्यात लहान संख्या आहे.
राष्ट्रीय गणित दिवस केव्हा साजरी करतात ?
श्रीनिवास रामानुजन यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांचा जन्म दिवस, 22 डिसेंबर हा राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो.
ABHED बुलेट प्रूफ जॅकेट
ABHED Bulletproof Jacket
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान, संरक्षण
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) बातम्यांमध्ये असलेले ABHED बुलेट प्रूफ जॅकेट बद्दल बरोबर विधान निवडा.
1. हे बुलेट प्रूफ जॅकेट इस्त्रो (ISRO) ने बनवले आहे.
2. हे बुलेट प्रूफ जॅकेट 360-डिग्री संरक्षण प्रदान करतात.
3. दोन्ही बरोबर
4. दोन्ही चूक
उत्तर : हे बुलेट प्रूफ जॅकेट 360-डिग्री संरक्षण प्रदान करतात. हे बरोबर विधान आहे.

ABHED बुलेट प्रूफ जॅकेट कोणी तयार केले ?
डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) दिल्लीच्या संशोधकांसोबत ABHED (ॲडव्हान्स्ड बॅलिस्टिक्स फॉर हाय एनर्जी डिफीट) नावाची कमी वजनाचे बुलेट प्रूफ जॅकेट तयार केले आहे.
ABHED (Advanced Ballistics for High Energy Defeat) बद्दल थोडक्यात माहिती :
• पॉलिमर आणि बोरॉन कार्बाइड सिरॅमिकपासून ही जॅकेट्स तयार करण्यात आली आहेत.
• विविध Bureau of Indian Standards (BIS) स्तरांसाठी किमान संभाव्य वजन 8 kg आणि 9.3 kg असेल.
• या बुलेट प्रूफ जॅकेटला समोर आणि पाठीमागील कवच असून ते 360-डिग्री संरक्षण प्रदान करतात.
• हे बुलेट प्रूफ जॅकेट सैनिकांचे संरक्षण आणि गतिशीलता वाढवेल.