
चालू घडामोडी 13, जानेवारी 2025 | महाकुंभ मेळा 2025

महाकुंभ मेळा 2025
Maha Kumbh Mela 2025
Subject : GS - इतिहास- कला आणि संस्कृती
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महाकुंभ मेळा 2025 चे आयोजन करण्यात आले आहे ?
1. हरिद्वार
2. उज्जैन
3. नाशिक
4. प्रयागराज
उत्तर : प्रयागराज (उत्तर प्रदेश)
बातमी काय आहे ?
13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 दरम्यान उत्तर प्रदेशातील प्रयागराज या पवित्र शहरात महाकुंभ मेळा भरणार आहे.
कुंभमेळा बद्दल महत्त्वाची माहिती :
• कुंभमेळा म्हणजे ठराविक आवर्तन काळानुसार पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्री भरणारा हिंदू भाविकांचा मेळा आहे.
• ज्यामध्ये करोडो भाविक कुंभोत्सवात जमतात आणि पवित्र नदीत स्नान करतात.
• खगोलशास्त्रीय गणनेनुसार, मकर संक्रांतीच्या दिवशी जेव्हा सूर्य आणि चंद्र वृश्चिक राशीत आणि गुरु मेष राशीत प्रवेश करतात तेव्हा हा पवित्र उत्सव सुरू होतो.
• हा काळ आध्यात्मिक शुद्धी आणि आत्म-ज्ञानासाठी शुभ काळ मानला जातो.
कुंभमेळा ची पौराणिक कथा :
• देव आणि दैत्यांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन केले होते.
• त्यावेळी अमृत कलश बाहेर आला पण तो दैत्यांपासून वाचविण्यासाठी देव तो अमृतकलश घेऊन पळू लागले.
• तेव्हा हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक या चार ठिकाणी अमृताचे थेंब पडले म्हणून या ठिकाणी कुंभमेळा आयोजीत केला जातो.
कुंभमेळ्याचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व काय आहे ?
• कुंभमेळा भक्तगण किंवा श्रद्धाळूंना आत्मशुद्धीची एक संधी देतो.
• अशी मान्यता आहे की, कुंभमेळ्यात शाही स्नान केल्यामुळे आत्मशुद्धी होते, पापांचा नाश होवून मोक्ष प्राप्ती होते.
• कुंभमेळा म्हणजे साधू-संत, गुरु, भक्तगण आणि श्रद्धाळू यांच्यातील ज्ञान, भक्ती आणि सेवा यांची देवाणघेवाण करणारे एक महत्त्वाचे केंद्र आहे.
कुंभ आणि महाकुंभ मेळाव्यात फरक काय ?
किती प्रकारचे कुंभ मेळे असतात ?
कुंभमेळ्याचे कुंभमेळा, अर्ध कुंभ, पूर्ण कुंभ आणि महाकुंभमेळा असे 4 प्रकार आहेत.
1. कुंभमेळा : दर 3 वर्षांनंतर एकदा अश्या पद्धतीने बारा वर्षांत प्रयागराज, उज्जैन, नाशिक (त्र्यंबकेश्वर), हरिद्वार या चार वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री कुंभमेळे भरत असतात.
2. अर्धकुंभ मेळा : दर 6 वर्षांनी हरिद्वार व प्रयाग येथे अर्धकुंभमेळा भरतो.
3. पूर्णकुंभ मेळा : प्रत्येक 12 वर्षांनी पूर्णकुंभ मेळ्याचे आयोजन केले जाते.
4. महाकुंभमेळा : बारा पूर्ण कुंभमेळ्यांनंतर म्हणजे तब्बल 144 वर्षांनंतर प्रयागराज येथे महाकुंभमेळा भरतो.
कुंभमेळा तीर्थक्षेत्र आणि पवित्र नद्या :
1. उत्तराखंडमध्ये, हरिद्वार येथे गंगा नदीच्या काठावर
2. उत्तर प्रदेशमध्ये, प्रयागराज येथे गंगा, यमुना आणि पौराणिक अदृश्य सरस्वती यां नद्यांच्या संगमावर
3. मध्य प्रदेशातील, उज्जैन येथे शिप्रा नदीच्या काठावर
4. महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर/नाशिक येथे, गोदावरी नदीच्या काठावर
कुंभमेळा ची युनेस्कोच्या मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत केव्हा नोंद करण्यात आली ?
• UNESCO द्वारे 2017 मध्ये मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून कुंभमेळा ची नोंद करण्यात आली.
• कुंभमेळा आधुनिकीकरणाच्या युगात प्राचीन परंपरांचे अस्तित्व आणि उत्क्रांतीचा पुरावा म्हणून ओळखला गेला.