
चालू घडामोडी 31, डिसेंबर 2024 | SpaDeX मिशन

SpaDeX mission
SpaDeX मिशन
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) SpaDeX मिशन बद्दल खालील विधानांचा विचार करा आणि योग्य विधान/विधाने असलेला पर्याय निवडा.
A. हे मिशन ISRO ने लॉन्च केले आहे.
B. या मिशनमध्ये दोन उपग्रह एकमेकांना जोडण्यात येणार आहे.
पर्याय :
1. फक्त A बरोबर
2. फक्त B बरोबर
3. A आणि B दोन्ही बरोबर
4. A आणि B दोन्ही चूक
उत्तर : A आणि B दोन्ही बरोबर
बातमी काय आहे ?
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) 30 डिसेंबर 2024 रोजी स्पेस डॉकिंग प्रयोग (SpaDeX) मिशनचे प्रक्षेपण केले.
डॉकिंग (Docking) म्हणजे काय ?
अंतराळामध्ये दोन उपग्रहांना किंवा अंतराळ यानांना जोडणे म्हणजे डॉकिंग.
SpaDeX म्हणजे काय ?
SpaDeX मिशन काय आहे ?
• SpaDeX चा फूल फॅार्म Space Docking Experiment असा होतो.
• SpaDeX मिशनचे प्राथमिक उद्दिष्ट दोन लहान अंतराळयानांच्या भेटीसाठी, डॉकिंगसाठी आणि अनडॉकिंगसाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करणे आणि त्याचे प्रदर्शन करणे आहे.
• SpaDeX मिशन मध्ये PSLV रॉकेटचा वापर करून SDX01 (चेझर) आणि SDX02 (टार्गेट), नावाचे दोन लहान उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 470 किलोमीटर अंतरावर पृथ्वीच्या खालच्या कक्षेमध्ये ( Low Earth Orbit) स्थापित करण्यात येणार आहे.
• त्यानंतर हे दोन उपग्रह एकमेकांपासून दूर जातील. त्यानंतर त्यांना थांबवून या दोन उपग्रहांची तपासणी करण्यात येईल.
• हे दोन उपग्रह एकमेकांसोबत जोडून एक सिंगल प्लॅटफॉर्म बनवण्यात येईल यालाच डॉकिंग म्हणतात.
उपग्रहांचं वजन किती आहे ?
या दोन्ही उपग्रहांचं वजन प्रत्येकी 220 किलो आहे.
SpaDeX हे किती वर्षांची मोहिम आहे ?
SpaDeX हि 2 वर्षांची मोहिम असणार आहे.
SpaDeX मिशनचा फायदा काय होईल ?
• ही यंत्रणा मोठ्या संरचना एकत्र करण्यासाठी किंवा उपकरणे, क्रू किंवा अंतराळातील पुरवठा हस्तांतरित करण्यासाठी महत्त्वाची आहे.
• उदाहरणार्थ, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (International Space Station) हे तंत्र वापरून बांधले गेले आहे.
• विविध मॉड्यूल्स स्वतंत्रपणे लॉन्च केले गेले आणि अंतराळात जोडले (डॉक) केले गेले.
• या तंत्रज्ञानाचा वापर करून अंतराळातील स्पेस स्टेशन मध्ये अंतराळवीर पाठवले जातात त्यानंतर त्यांना पुन्हा पृथ्वीवर परत आणले जाते.
• चंद्रयान-4, गगनयान मिशन, अंतराळ स्थानके आणि भारताच्या नियोजित भारतीय अंतरीक्ष स्टेशन (BAS) सारख्या भविष्यातील मोहिमांसाठी SpaDeX मिशन महत्त्वपूर्ण आहे.
या मोहिमेत नंतर डॉकिंग (Docking) तंत्रज्ञान विकसित करणारा भारत कितवा देश असेल ?
• आतापर्यंत डॉकिंग तंत्रज्ञान फक्त अमेरिका, रशिया आणि चीन या तीन देशांनीच यशस्वी रित्या विकसित केले आहे.
• या मोहिमेनंतर भारत 4 था देश असेल.