
चालू घडामोडी 6, सप्टेंबर 2024

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना नोंदणी सप्टेंबर मध्येही सुरू
बातम्यांमध्ये : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेसाठी राज्यातील पात्र महिलांना आता सप्टेंबर २०२४ मध्येही नोंदणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
Subject : GS - सरकारी योजना
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणते ॲप सुरू करण्यात आले आहे ?
1. नारी शक्ती दूत ॲप
2. नमन ॲप
3. स्वयंम ॲप
4. यांपैकी नाही
उत्तर : नारी शक्ती दूत ॲप

काय आहे ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ ?
• राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषाणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ योजना सुरु केली आहे.
• हि योजना मध्य प्रदेशातील लाडली बेहना या योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे.
• महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ जुलै पासून सुरू करण्यात आली.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश काय आहे ?
• राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी – सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे.
• त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे.
• राज्यातील महिला स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे.
• राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना देणे.
• महिला आणि त्यांच्यावर अवलंबुन असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे स्वरुप कसे आहे ?
• पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वत:च्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात दर महिन्याला 1500 रुपये इतकी रक्क्म थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) द्वारे त्यांच्या बॅंक खात्यात जमा केली जाईल.
• जर एखादी महिला केंद्र किंवा राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे रु.1500/- पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल.
• मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नारी शक्ती दूत ॲप सुरू करण्यात आले आहे.
ड्युरंड कप 2024
Durand Cup 2024
Subject : GS - खेळ
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) ड्युरंड कप, संतोष ट्रॉफी आणि रोव्हर्स कप कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ? (SSC 2022)
1. हॉकी
2. क्रिकेट
3. फुटबॉल
4. बॅडमिंटन
उत्तर : फुटबॉल

• नॉर्थईस्ट युनायटेड फुटबॉल क्लब संघाने 2024 चा ड्युरंड कप जिंकला.
• त्यांनी अंतिम फेरीत मोहन बागानचा पेनल्टीवर ४-३ असा पराभव केला.
• नॉर्थईस्ट युनायटेड फुटबॉल क्लब या विजयी संघाचा मालक जॉन अब्राहम आहे.
• यंदाची ड्युरंड कपची 133 वी आवृत्ती होती.
ड्युरंड कपबद्दल महत्त्वाची माहिती :
• ही आशियातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे.
• 1988 मध्ये शिमला येथे उद्घाटन संस्करण झाले त्यावेळी याला आर्मी चषक म्हणून ओळखले जायचे.
• सर हेनरी मार्टिमर ड्युरंड हे या स्पर्धेचे संस्थापक होते; म्हणून या स्पर्धेस ड्युरंड कप म्हणतात.
• सुरुवातीला स्पर्धा फक्त ब्रिटिश भारतीय सैन्य दलासाठी खुली होती.
• या स्पर्धेत विजेत्या संघाला तीन ट्रॉफीने गौरविण्यात येते.-
‣ ड्युरंड कप
‣ शिमला ट्रॉफी
‣ राष्ट्रपती चषक
साओरा आदिवासीं जमात
Saora Tribe
Subject : GS - लोकसंख्या
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) बातम्यांमध्ये असलेली साओरा आदिवासीं जमात प्रामुख्याने खालील पैकी कोणत्या राज्यात आढळते ?
1. महाराष्ट्र
2. कर्नाटक
3. ओडिशा
4. हिमाचल प्रदेश
उत्तर : ओडिशा

बातम्यांमध्ये : अलीकडेच गजपती जिल्ह्यातील साओरा आदिवासींना त्यांच्या वडिलोपार्जित जमिनींवर अधिवासाचा हक्क मिळाला.
विशेषत: असुरक्षित आदिवासी गटांना (PVTGs) सर्वाधिक संख्येने असे अधिकार देणारे ओडिशा हे एकमेव राज्य ठरले आहे.
साओरा समुदायाबद्दल थोडक्यात माहिती :
• साओरा ही ओडिशातील प्राचीन जमातींपैकी एक आहे.
• साओरा जमातीचा उल्लेख रामायण आणि महाभारत या महाकाव्यांमध्येही आढळतो.
• त्यांना सावरस, सबरस, सौरा, सोरा इत्यादी विविध नावांनी ही ओळखले जाते.
• सोरा ही त्यांची स्वतःची मूळ भाषा आहे.
• भारतातील काही मोजक्या जमाती आहेत की ज्यांच्याकडे स्वतः च्या भाषेसाठी लिपी आहे.
• सोरांग सोम्पेंग ही सोरा या भाषेची लिपी आहे.
पॅरिस पॅरालिंपिक 2024 मध्ये सांगलीच्या सचिन खिलारीने जिंकले रौप्यपदक
Subject : GS - खेळ
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये सचिन खिलारीने रौप्यपदक जिंकले आहे ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
1. थाळीफेक
2. तिरंदाजी
3. नेमबाजी
4. गोळाफेक
उत्तर : गोळाफेक

• सांगलीच्या सचिन खिलारीनं भारताला पॅरिस पॅरालिंपिकमध्ये रौप्यपदक मिळवून दिलं.
• सचिननं पुरुषांच्या शॉट पुट म्हणजे गोळाफेकीच्या स्पर्धेत F46 प्रकारात 16.32 मीटरवर गोळा फेकला.
• सचिन मूळचा सांगलीतल्या आटपाडीमधल्या करगणी गावचा रहिवासी आहे.
• शाळेत असताना सायकलच्या अपघातात त्याच्या डाव्या हाताला दुखापत झाली. गँगरीनही झालं आणि हात पुढे निकामी झाला.
• अपंगत्व आलं तरी सचिननं कधीच हार मानली नाही. त्याने खेळ आणि अभ्यास या दोन्हीत यश मिळवलं.